“नीता गेली”.

हे दोन शब्द ज्यांनी कुणी ऐकले, त्यांच्या कानातून शिसाच्या रसासारखा प्रखर जाळ करत हुंदक्याच्या रूपाने बाहेर पडले. अपार वेदनेचा दाह तसाच ठेवत; आयुष्यभर त्यांच्यासोबत.

प्रत्यक्ष मरण येण्यापूर्वी किती तरी वेळा मरत असतो आपण सगळेच. श्वास चालू आहे म्हणून जिवंत असणारे किंवा कृत्रिम श्वासोछ:वासावर जगतच असतात बरेच, वर्षानुवर्ष. शिवाय जिवंतपणी मरण अनुभवणारे देखील. मृत्युला आव्हान देणारे, ‘लिव्हिंग डेंजरसली’ म्हणण्याइतके साहसी. हिरव्या सिग्नलची वाट न बघता, भरधाव वाहनांनी गजबजलेला रस्ता ओलांडून पलीकडील बाजूस सैरावैरा धावत सुटणारे, पादचारी पूल असूनही रेल्वे रूळ ओलांडणारे; झालचं तर विमान चालवत आहोत अशा जीवघेण्या वेगात मोटरसायकल चालवणारे, चालती बस पकडणारे, धावत्या ट्रेनच्या दारात विजेचे खांब चुकवत लोंबकळणारे, ‘धोकादायक समुद्र किनारा’ अशा ठळक अक्षरांकडे दुर्लक्ष करत पाण्यात उतरणारे; एक ना अनेक प्रकारे ‘मरणातच जग जगते’ ह्याची प्रचीती देणारे. आणि ह्या पैकी काहीही न करता अशा लोकांच्या आसपास घोटाळणारा मृत्यू बघून हळहळणारे इतर; पहात असताना त्यांच्या जीवाचा थरकाप उडविणारे, त्यांना मृत्यूचा अनुभव देणारे क्षण.

नीताचा मृत्यू ह्यापैकी कोणत्याही कारणाने झाला नाही. नैसर्गिक म्हणावा, तर तसा तो होता हे खर. आधी बारीक ताप, मग न्युमोनिआ; छातीत उबदार घर करून बसलेला. तो शेवटचा थांबा. तिच्यावर मृत्यू लादला गेला.

मनाने ती कधीच मेली होती, रोजच मरत होती; शरीराने आज मृत झाली इतकच. तशी ती जाणार होतीच एक ना एक दिवस. असाध्य व्याधी जडल्यावर तेच तर होणार होत; प्रश्न होता कधी? इतकाच. डॉक्टरांच्या मते असा पेशंट जास्तीत-जास्त किंवा कमीत-कमी किती वर्ष जगू शकतो, नक्की सांगता येत नाही.

खर तर नीता जगलीच नाही; ती फक्त श्वास घेत होती म्हणून  जिवंत होती असं म्हणायचं.

————————————————————————–

sad-woman

माझ्या नाका-हातात नळया घातल्यायत. दिसत आहे ते. पण वेदना कशा होत नाहीत? सारं अस्पर्श असल्यासारख कां वाटतय? आणि माझ बाळ कुठे आहे? ते कोण डोकावलं? मी ओळखू शकत नाहीये कां? माझं बाळ. सगळे हसतात त्याला बाळ म्हटल की. चांगला दहा वर्षाचा आहे तो, त्याला बाळ काय म्हणतेस? बर झालं त्याच्या टेस्टस केल्या. मउसुत हात होते त्याचे; अजूनही आहेत. तोंडातून हुं की चू केलं नाही त्याने, जेव्हां सुई घुसवली हातात. ‘शाळेत कशा युनिट टेस्ट असतात, तशीच ही माझ्या राजा’ इतकचं म्हटल, तर लगेच हात पुढे केला. तो सुखरूप आहे नां? तो पॉझीटीव्ह आहे की निगेटिव्ह? कुणीच सांगितल नाही मला. लपवत आहेत कां माझ्यापासून?

——————————————————————-

‘मुंगीच आयुष्य किती?’

‘अरे आपल्याला कसं कळणार कोणती मुंगी किती जगली ते? त्यांच्यात म्हाताऱ्या कोणत्या आणि तरुण कोणत्या हे कसं समजणार?

‘ते ही मला माहित्ये. जर मुंगी कडकडून चावली तर तरुण. जर हळूच चावली तर म्हातारी.’

‘हा हा! तुझ लॉजिक पटण्यासारख आहे… त्या इतक्या कामसू असतात, की अगदी फिट रहात असाव्यात आणि खूप वर्ष जगत असाव्यात’.

‘कमाल का लॉजिक है मम्मी पण… चूक! मुंगीच आयुष्य असत फक्त काही आठवडे. पण त्याहूनही कमी जर ती तुला चावली!’

———————————————————————-

तू असा दिवाभितासारखा कां वागायचास रे? रात्री तर तू कधी घरीच नसायचास; यायचास तो पार सकाळी; दुधवाले, पेपरवाले येत तेव्हां. तुला आठवतय? ३१ डिसेंबरला सगळे जमले होते आपल्या घरी. कित्ती मज्जा येत होती, तितक्यात तू बाहेरून कुठूनसा आलास आणि कुणाशी एक शब्द न बोलता परत बाहेर निघून गेलास. त्या पाच मिनिटांसाठी सगळे स्तब्ध झाले. जसं काही तू कुणी परका होतास. किंवा आम्ही सगळे परके वाटलो तुला. आपल्या लग्नाआधी तू खूप बोलका होतास म्हणे; मग नंतर तुटकपणे कां वागू लागलास? वास्तविक तू स्वत:ला असं बंदिस्त करून घेण्याचं कारण नव्हतं. कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमाला तू जायचा नाहीस.  कुणीही विचारल की तुझ उत्तर ठरलेलं; वेळ नाही. जगात फक्त तू एकटाच बिझी होतास? लोक बरेच येत तूला भेटायला. तुटकपणे वागलास तू सगळ्यांशी. तरी. तू बरा व्हावास म्हणून काय नाही केलं? पार बंगलोरला नेउन आणलं तुला. ते दिवस आठवले तरी काटा येतो अंगावर.

———————————————————————-

अम्ब्युल्न्स येताच नीताच्या सासूने हंबरडा फोडला, जमलेल्या लोकांच हृदय हेलावणारा. स्त्रियांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. काहीना तर दुख: अनावर झाल आणि त्या मृत देहाकडे झेपावल्या. ती जिवंत असताना तिचा दुस्वास करणारी सासू तिच्या मृत्त्यूनंतर इतकी विव्हल झाली ह्याच काहीना आश्चर्य वाटल. त्याना काय माहीत की ती आपल्या दिवंगत मुलाच्या आठवणीत रडत्ये. आधी तो गेला, आता ही.

‘अकाली गेली बिचारी’, एक-दोन बायका कुजबुजल्या. तिच्या असाध्य व्याधी बद्दल उडत-उडत का होईना, त्यांच्या कानावर आलं होत. मरण्याच काय किंवा जगण्याच काय, ठराविक वय थोडीच असत? जगात म्हणे असे काही प्रदेश आहेत, जिथे माणूस अकाली म्हातारा होतो किंवा तो जलद जगतो; मरणाकडे जलद जातो असं म्हणू हव तर. तसच असे ही प्रदेश आहेत, जिथे माणूस अधिक वर्ष जगतो. मुळात जन्माला येण तरी कुणाच्या हातात असत? फार पूर्वी तर इतक्याशा तापात लोक जायची. हल्ली मेडिकल सायन्स खूपच प्रगत झालय. सगळ्या साधारण आणि असाधारण व्याधीवर औषधं मिळतात. ज्यामुळे माणसाचं सरासरी वय वाढलय. पण नीताच्या आजारावर तात्पुरते उपचार होते, कायमस्वरूपी उपाय नव्हता. मरण लांबवण्यापेक्षा मिळालेलं जीवन छान जगण केव्हांही चांगलं, तर तेही तिला शक्य झालं नाही.

डॉक्टरांच तापावर खूप लक्ष असत. कोणत्याही व्याधीने आजारी असलेल्या माणसाचं  बॉडी टेंपरेचर स्टेबल असाव लागत, किंबहुना ते स्थिर रहाव ह्याकडे ते लक्ष ठेवून असतात. नीताचं अंग तर नेहेमीच उष्ण असे. बारा महिने. काही लोकांचे हात थंडगार असतात, बर्फात ठेवल्यासारखे. तसे हिचे उष्ण. ताप असल्यासारखे. उष्णता आणि ताप, शारीरिक आणि मानसिक; दोन्ही. आधी नवरा गेला म्हणून. नंतर सासरच्यानी दूर लोटलं म्हणून; मुलासकट. दहाव्याला कावळा शिवायला तब्बल दहा मिनिट लागली. शिवला तर मुक्ती लाभते म्हणे. जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती. कायमची. नीताशी जे चांगले वागले नाहीत, त्यांना मुक्ती मिळेल कां? एक-एक करत लोक परत जायला लागले. अनिकेत तिथेच खिळून होता.

नीताच्या वाटयाला आला स्वत:च्या कामेच्छेवर ताबा न ठेवता येणारा नवरा. ताबा ठेवण कठीण पण अशक्य नाही हे खर असलं तरी विवाहित असूनही परस्त्रीशी संभोग करण अनुचितच. पत्नी व्यतिरिक्त इतर स्त्रीयांबरोबर संभोग करणाऱ्या पुरुषामुळे बळी पडणाऱ्या अनेक नीता आहेत आणि पुरुषांच्या कामेछांना वाट करून देणाऱ्याही स्त्रीयाच. हे झालं विवाहितांबद्दल. आणि अविवाहित? त्यांनी काय करायचं? ज्याचा-त्याचा प्रश्न, असं म्हणून मोकळ होता येईल? शिवाय पत्नी व्यतिरिक्त दुसऱ्या स्त्रीबरोबर संबंध भावनिकसुद्धा असू शकतो. म्हणजे स्त्री आणि पुरुष, दोघही अगतिक? अनिकेतच विचार चक्र थांबेना.

————————————————————————

‘तू अगोदर भेटायला हवा होतास रे…’

‘अगोदर? तूच म्हणलीस ना चार वाजतां भेटु!’

‘अरे म्हणजे माझं लग्न व्हायच्या आधी!

‘ओ! सॉरी… पण तुला एक सांगू? आपलं लग्न झालं असत तर आपण जसे मित्र म्हणून भेटतोय तसे नवरा बायको म्हणून भेटलो असतो कां…’

‘कां नाही? नक्कीच भेटलो असतो. मी अजितला किती वेळा सांगून पाहिलं… पण नाही. तो नाही भेटला असा. तो व्यक्त झालाच नाही. माझ्याशी… घरातल्यांशी…’

‘तू तर सिरीयस झालीस की. कमॉन! चीअर अप!’

‘आपण अपघाताने भेटलो नाही?’

‘शब्दश:… ‘

‘म्हणजे बघ ना, ड्राइव्ह करत असताना ब्रेक लागला नाही आणि कार फुटपाथवर चढून पार त्या शोरूमच्या काचेवर आदळली. तुझ्यामुळे मी वाचले. हे मला नंतर कळल म्हणा’

‘हो ना! अपघातात जे कुणी सापडलंय त्याला वाचवण्याऐवजी जमलेले लोक फोटो काढत होते, प्रत्येक गोष्टीचा सोहळा करत आहेत लोक; हल्ली बघे निर्माण झालेत.…’

‘तूच एकटयाने अजितचा हात हातात घेतला होतास. अगदी अलगद, तरी घट्ट आणि डावा हात त्याच्या हातावर ठेवून थोपटत राहिलास. ते पाहून मला रडूच कोसळणार होत पण हुंदका दाबला मी’.

————————————————————————–

नीता गेली. दुसऱ्याच्या चुकीची भयानक शिक्षा भोगली तिने. आणिकदाचित तिचा मुलगासुद्धां भोगणार. जर योग्य ती औषधं आणि काळजी घेतली तर जगण थोड सुसह्य होईल त्याचं इतकंच. डॉक्टर्स म्हणले की तो ही ‘पोझिटिव्ह’ आहे. म्हणजे जगेल पण नक्की किती वर्ष ते सांगता येणार नाही. आणि वेदनांच काय? इतक्या लहान वयात सोसवेल कां त्याला?

————————————————————————–

दुपारचे अडीच वाजलेत. अनिकेतचा आज वीकली ऑफ. गरगरणाऱ्या पंख्याच्या जोडीला त्याच मनदेखील अस्थिर. खिडक्या उघडया आहेत पण वाऱ्याची झुळुक नाही. दूरून येणारे दोन स्पष्ट आवाज; कोकिळेची घुमणारी तान आणि पिठाच्या चक्कीवर फिरणाऱ्या लोखंडी खिळ्याची कर्कश खरखर.

एक मंद सुगंध जाणवला त्याला आणि पाठोपाठ सगळी खोली तीव्र पांढऱ्या प्रकाशाने उजळून निघाली. लाख सूर्यांचा डोळे दिपवणारा प्रकाश. त्याने अभावितपणे हात डोळ्यांसमोर धरले. त्याला कळेना अचानक इतका तीव्र प्रकाश आला कुठून? त्याचे डोळे पाणावले. आणि प्रकाशाच्या तीव्रतेतून ती समोर आली. अनिकेत दचकला. हा भास की स्वप्न? मागे सरकून त्याने धीट नजरेने तिच्याकडे पाहिलं.

तिच्या चेहेऱ्यावर कोणतेही भाव नव्हते, होती फक्त सगळं संपल्यावर शिल्लक राहणारी हतबलता. तिला असं पाहून अनिकेतला हुंदका आवरला नाही. त्याला काहीतरी देण्यासाठी तिने हात पुढे केला. तो पुढे झुकला पण तिच्यापर्यंत पोहचू शकला नाही. प्रकाशाची तीव्रता हळूहळू क्षीण झाली आणि नीताची आकृतीदेखील.

————————————

 

 

Advertisements